भारत- पाकिस्तानमध्ये झालेला सिमला करार नेमका काय होता जाणून घ्या



● सिमला करार हा बांगलादेशाच्या निर्मितीनंतर भारत व पाकिस्तान या दोन देशांत सिमला (हिमाचल प्रदेश) येथे २ जुलै १९७२ रोजी झालेला करार आहे. 

● तत्पूर्वी भारत-पाकिस्तान युद्धात (डिसेंबर १९७१) पूर्व पाकिस्तान हा भाग पाकिस्तानला गमवावा लागला. पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष व लष्करप्रमुख याह्याखान यांनी राजीनामा दिला आणि झुल्फिकार अली भुट्टोंचा पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष व लष्करी कायदा प्रशासक म्हणून २० डिसेंबर १९७१ रोजी शपथविधी झाला.

● युद्धविरामानंतर दोन्ही देशांनी असा निश्चय केला की, उभय देशांतील संघर्ष व वैर संपवून एकमेकांचे प्रश्न सामोपचाराने, शांततामय मार्गाने व सामंजस्याने सोडवावेत आणि भारतीय उपखंडात दीर्घकाळ शांतता नांदेल असा प्रयत्न करावा. 

● हा उद्देश गाठण्यासाठी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात २८ जून ते २ जुलै १९७२ दरम्यान सिमला येथे वाटाघाटी व विचारविनिमय होऊन करार करण्यात आला. 


या करारातील काही प्रमुख मुद्दे

● संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेमधील तत्त्वे आणि उद्दिष्टे यांचा आदर करून दोन्ही देशांचे संबंध प्रस्थापित व्हावेत. 

● दोन्ही देशांनी शांततामय मार्गाने व वाटाघाटीने परस्परांतील मतभेद द्विपक्षीय चर्चेद्वारे मिटवावेत. 

● शांततामयसह अस्तित्वासाठी सलोखा, शेजारधर्म आणि निरंतर शांतता या पूर्वाकांक्षित तत्त्वांची आश्वासित भूमिका दोन्ही देशांनी स्वीकारून एकमेकांविषयी आदर बाळगावा. 

● समता आणि उभयतांचे कल्याण या पायाभूत तत्त्वावर आधारित प्रादेशिक अखंडत्व आणि सार्वभौमत्व यांचा मान राखून एकमेकांच्या अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ करू नये. 

● मूलभूत समस्या आणि काश्मीरचे कारण पुढे करून दोन्ही देशांत गेली पंचवीस वर्षे संघर्षमय वातावरण होते. त्यामुळे संबंध दुरावले होते. ते शांततामय मार्गाने व सामोपचाराने निकालात काढावेत. 

● उभय राष्ट्रांनी परस्परांची राष्ट्रीय एकात्मता, प्रादेशिक अखंडत्व, राजकीय स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यांबद्दल आदराची भावना ठेवावी. 

● संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेनुसार दोन्ही देशांनी शत्रूत्व निर्माण होईल, असे प्रतिकूल वातावरण वा प्रचार एकमेकांविरुद्ध करु नये.