कोरोना काळातील एक अविस्मरणीय क्षण - ✍️ संदिपान कोकाटे
दिनांक १४ जून रोजी निपाणी ता. भूम येथून मोटारसायकल वर मी व अनंत उद्धवराव पाटील आम्ही दोघेच जातेगाव, पाचंग्री, लिंबागणेश, मांजरसुंभा मार्गे प्रवास करीत करीत गाडी बीड पासून जवळच असलेल्या खजाना विहिरीजवळ पोहोचलो. कोरोणा या संसर्गजन्य रोगामुळे तेथे कोणीही इतर पर्यटक नव्हते. खजाना विहीर या अगोदर ही अनेक वेळा पाहिल्यामुळे विहीरीचे ठिकाण कोणालाही विचारायची गरज भासली नाही. शहरापासून जवळच ४ किमीच्या अंतरावर #खजानाबावडी नावाची एक प्राचीन विहीर आहे. त्या विहीरीत फक्त चार फूट इतकंच पाणी असतं. आणि ते कधीच कमी-जास्त होत नाही असं म्हणतात.
सोळाव्या शतकात मराठवाड्यावर निजामांची सत्ता होती. त्या काळात शेताला पाणी पुरवठा करण्यासाठी अहमदनगरचा राजा मुर्तूजा खान याने बीडचा तत्कालीन सरदार सलाबत खान याला खजाना देऊन इथं एक विहीर बांधायला सांगितली. त्या काळचा प्रसिद्ध वास्तूशास्त्रज्ञ राजा भास्कर याने इ.स. १५७२ मधे ही विहीर बांधली. मुर्तूजाशाहकडून आलेला सगळा खजिना या विहीरीसाठीच खर्च झाला, म्हणून या विहीरीला #खजिनाविहीर म्हणतात. जमिनीपासून १७ फुटांवर विहिरीत गोलाकार ओरांडा आहे, त्यावर आपण सहज फिरू शकतो. तिथे बसण्यासाठी तीन दगडी बाकडेही बांधलेले आहेत. या विहिरीचं पाणी कायम चार फूट इतकंच असतं आणि ते कधीच आटत नाही. या विहिरीला तीन बोगदे आहेत. यातील एक नैऋत्य, दुसरा आग्नेय तर तिसरा उत्तर दिशेला आहे. नैऋत्य आणि आग्नेय दिशेला असलेले बोगदे हे ह्या विहीरीचे इनलेट आहेत. या दोन बोगद्यांद्वारे विहिरीत पाणी येतं. तर उत्तर दिशेचा बोगदा हा आउटलेट आहे. यातून हे पाणी बाहेर जातं. विहिरीतला उत्तर दिशेचा बोगदा हा एक कालवा आहे. त्या काळात शेताला ह्याच कालव्याद्वारे पाण्याचा पुरवठा व्हायचा. या कालव्याद्वारे बीड शहरातील बलगुजर भागापर्यंत अजूनही पाणी येतं असे तेथील स्थानिक सांगतात.
पंधरा मिनिटातच फोटो काडुन व माहिती घेवून तेथून गाडी सुरू केली ती थेट बीड च्या शिवाजी चौकात पोहोचली. १९९६ ते १९९८ पर्यंतच माझं शिक्षण बीड येथेच झाले असल्यामुळे व अनंत पाटील यांचे साधारण १० वर्ष बीड मध्येच शिक्षण घेतले असल्याने व दरवर्षी चारपाच वेळा येथे येत असल्याने शहरातील बरीचशी माहिती आम्हा स्वतः लाच होती. म्हणून मी बीड किल्ल्याचा प्रवेश दरवाजा म्हणजेच राजुरी दरवाजा जवळ गेलो.
#बीडचाकिल्ला हैद्राबादच्या निजामाने बांधला असे म्हणतात तर बहामनी काळात हा किल्ला बांधल्याचे gazetteers सांगतात, बीर/भिर/बीड हा निजामशाही अंमलातील एक सुभा होता असं इतिहासकार सांगतात. तटबंदीसमोरील पुलाजवळ गाडी उभी करून जरा किल्ल्यावर फेरफटका मारला. किल्ल्यावर माणसांनी पूर्ण अतिक्रमण केल्याचे दिसले. किल्ल्यावरचे अतिक्रमण मी समजू शकतो, पण इतकी भयानक अस्वच्छता.. त्याचं काय..!! किल्ल्याच्या मुख्य दरवाजा समोरची #_बिंदुसरा नदीकाठी हगणदारी (एच.डी.).. कचराकुंडी.. हे कमी झाले कि काय म्हणून किल्ल्याला खेटून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीत सांडपाणी सोडून १००% गलिच्छ किल्ला करण्याची एकही संधी बीड किल्ले वासियांनी न सोडल्याचे दिसून आले. बिंदुसरा नदीचा पार सूर चेपून टाकला होता. राजुरी गेट इथे दोन फारसी भाषेतील शिलालेख दिसतात. एक दरवाजाच्या लगतच्या तटबंदीवर, तर दुसरा दरवाजाशेजारील लाईट च्या खांबाच्या मागील भिंतीवर. दरवाजासमोर आडवी भिंत आणि डावीकडे एक बुरुज.. आत फेरफटका मारला आणि गडावर आणखी काही पाहण्यासारखे नं सापडल्याने मिळेल ते ऐतिहासिक अवशेष कॅमेराबंद केले. किल्ल्याला एकूण पाच दरवाजे आहेत, बशीर गेट, कोतवाली दरवाजा, धोंडिपुरा गेट, राजुरी दरवाजा, गंज गेट हि त्यांची काही नावे.
बिंदुसरा नदीच्या पूर्वेकडील काठावर (पुलाच्या पलीकडे) श्री. कंकाळेश्वराचे प्राचीन हेमाडपंती मंदिर असल्याने तिकडे निघालो. पूल ओलांडताच उंचपुरी चिंचेची झाडे दिसतात, इथे काही कबरी आणि एक भग्न इमारत दिसते. सिमेंट रस्त्यावरून निघालो.. एच.डी. चा घमघमाट सुटल्याने मी गाडी पुढे घेतली, मी मात्र चिंचेच्या झाडाजवळच्या इमारतीकडे निघालो.. इथे काही मंडळींचा पत्त्याचा डाव रंगला होता. आठ-दहा फुटी उंच एका बांधकामावर चढून पहिले समोर एक तिमजली मनोरा लक्ष वेधून घेत होता. तिथे एका दोस्ताला विचारलं बाबारे इथं काय आहे.. एक इथे भुयार आहे जे खाली निघते. भुयारी मार्ग..!! पण इथे अंधार असल्याने इथून जाणे धोक्याचे होते म्हणून एका अनामिक मनोऱ्याची भुयारी सफर रद्द केली आणि त्या दोस्ताचे आभार मानून कंकाळेश्वर मंदिराकडे निघालो.
वीस-पंचवीस पावलात कंकाळेश्वर मंदिरासमोर येवून पोहोचलो. थक्क करणारी या मंदिराची रचना आहे. या मंदिराचे बांधकाम यादवकालिन सून मंदिराचे सौंदर्य आणि कारीगरी बघण्यासारखी आहे. एक बांधीव तलाव, मध्यभागी एखाद्या जादुई बेटासारखे बांधलेले हेमाडपंती धाटणीचे मंदिर आणि उजवीकडे मंदिराकडे नेणारी पाण्यातून जाणारी एकमेव बांधीव वाट. ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ असे वाटावे इतके देखणे मंदिर. मंदिराचे बांधकाम थक्क करणारे आहे पण बहामनी क्रूरतेचा वरवंटा या मंदिरावर देखिल चालला असल्याचे दिसून आले. मंदिरच्या बाह्य भागातील जवळपास सर्व मुर्त्या कपाळकरंट्यान्नी तोडफोड करून उध्वस्त केल्याचे दिसून येते. “या मंदिराला जे खांब दिसत आहेत.. ते मोजल्यास दरवेळेस मोजणी चुकते.. पहिल्यांदा २० भरली असेल तर दुसऱ्यांदा मोजताना १९ होते.. त्यामुळे मंदिराचे एकूण खांब किती हे कुणीच नाही मोजू शकत.. एवढं भारी मंदिर राव.. पण त्या लोकांनी पार फोडून टाकलं”.. कंकाळेश्वराची मनोभावे लांबूनच नमस्कार करून परतीच्या प्रवासाला निघालो.
पुन्हा परतीच्या प्रवासासाठी बार्शी नाका येथे येवून पोहोचलो. तेथे ढगे कॉलनी मधील अनंत पाटील यांचे असलेले काम आटोपून निघालो ते थेट मंजरसुंभा येथेच पाणी पिण्यासाठी थांबलोत. तोपर्यंत आकाशातील ढगांनी खूपच अक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. ते रूप पाहूनच मृग नक्षत्राच्या पावसात भिजण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते असे वाटले. पण च्छा... आम्ही पावसाला शिवण्याचा प्रयत्न करत होतो, पण पाऊसही आमच्या पुढे पुढे पळतच राहिला..
✍️ संदिपान नामदेवराव कोकाटे
रा. निपाणी ता. भुम
मो. 9421445159
टिप्पणी पोस्ट करा