आमच्याकडे चावी आहे मराठा आरक्षणाची



मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राजकारण तापताना दिसत आहे. भाजप खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात मूक आंदोलन पार पडले. यावेळी समर्थकांसह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. यावरून दावे-प्रतिदावे सुरूच आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही याबाबत भाष्य केले असून, भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 



संजय राऊत हे चावी दिल्याशिवाय बोलत नाहीत, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला होता. याला संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. राजकारणात चावी द्यावीच लागते. मग ते पंतप्रधान असोत, मुख्यमंत्री असोत की माजी मुख्यमंत्री असोत. पक्षाचे आदेश, सूचना असतात. त्यानुसार भूमिका मांडावी लागते. आमच्याकडे चावी होती म्हणूनच आम्ही दीड वर्षांपूर्वी भाजपच्या सत्तेला टाळे लावले आणि आमच्या सत्तेचे टाळे उघडले, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला. तसेच राजकारणात कुलूप आणि चावी दोन्ही महत्त्वाच्या असतात. ज्याच्याकडे कुलूप आहे, तो कुठल्याही गोष्टीला टाळे लावू शकतो आणि ज्याच्याकडे चावी आहे, तो कुठलेही टाळे उघडू शकतो. आमच्याकडे चावी आहे. त्या चावीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, असे राऊत म्हणाले.