कानाचे दुखणे / ओटायटिस मीडिया म्हणजे काय?



ओटायटिस मीडिया म्हणजे काय? ओटायटिस हा ओट व आयटिस हे लॅटिन शब्द मिळून तयार झालेला शब्द आहे. ओटचा अर्थ कान व आयटिस म्हणजे सूज. मीडिया म्हणजे मध्य. आपला कान तीन भागांचा मिळून तयार झालेला असतो. पहिला बाह्य भाग, यात कानाची पाळी व कॅनॉल येतात. दुसऱ्या मध्य भागात कानाच्या पडद्यामागील तीन सूक्ष्म हाडे- मेलियस, इंक्स, स्टेपिस याशिवाय युस्टॅशियन ट्यूब तसेच मॅस्टॉइड एअर सेल्स असतात. तिसरा आतील भाग लॅबिरिन्थ हा असतो. यात कॉक्लिया, संतुलन तयार करणारे तीन गोलाकार कॅनॉल आणि अन्य सूक्ष्म रचना असतात. ओटायटिस मीडियामध्ये कानाचा पडदा, हाडे व मॅस्टॉइड पेशीवर परिणाम जाणवतो. याचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. पहिला अॅक्यूट यात अचानक संसर्ग होतो. येथे अचानकचा अर्थ दोन आठवड्यांपर्यंत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, याकडे खूप दिवस दुर्लक्ष केल्यास क्रॉनिक म्हटले जाते. तसे काही तज्ज्ञ ६ आठवड्यांहून अधिक जुन्या समस्येला क्रॉनिक मानतात. हे बहिरेपणाचे मुख्य कारण आहे. जे दुरुस्त होऊ शकते. या दोन अवस्थांत जर लक्षणे वेगवेगळी असतील तरी उपचाराच्या पद्धती त्याच आहेत. एका अंदाजानुसार १० पैकी ६ लोकांना ६ वर्षे वयापासूनच एकदा किंवा काही वेळा अॅक्यूट ओटायटिस मीडिया झालेला असतो. १५ टक्के लोकांना क्राॅनिक समस्या आढळून येते.


कारणे : नाक व गळ्यातील संसर्ग कानापर्यंत जातो. हे व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होते. सर्दी झाल्यावर नाकापासून कानाकडे जाणारी युस्टेशियन ट्यूब कार्य करणे थांबवते. यामुळे पडद्यामागे दबाव असह्य होतो. तेथे सूज येते. परिणामी, काही वेळा पडद्याला छेद पडू शकतो. काही रुग्णांमध्ये तो कायमचा राहतो. टॉन्सिल्स, वाढलेले अॅडेनायड्स, अॅलर्जिक रायनायटिस व सायनसची समस्याही कारणीभूत असते. वर्दळ असलेल्या व घाण जागेत राहणाऱ्या कुपोषित लोकांमध्ये ही समस्या जास्त असते. काही वेळा कानास मार लागल्यानंतर बाह्य संसर्गही होऊ शकतो. काही रुग्णांच्या पडद्यास छिद्र न पडता त्याच्या मागे द्रव जमा होते. याला सिक्रेटरी ओटायटिस मीडिया किंवा ग्लू इअर असे म्हणतात.


लक्षणे : अॅक्यूट अवस्थेत कानात अचानक दुखणे किंवा जड वाटू लागतो. ताप, चिडचिडेपणा, बेचैनी वाटणे अशी लक्षणे असतात. काही वेळा कान वाहू लागतो. यात नंतर दुखणे थांबते. क्रॉनिक अवस्थेत मुख्यत्वे दुखणे नसते. यात कान काही वेळा किंवा सतत वाहू लागतो. ऐकण्यास कमी येते. काही लोकांमध्ये ही समस्या केवळ कानाचे पडदे किंवा ऐकण्यापर्यंत मर्यादित राहते. परंतु ती आजूबाजूच्या रचनांवर परिणाम करू शकते. उपचार न घेतल्यास संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचतो आणि ब्रेन अॅब्सेस, मागे मेस्टॉयडायटिस व लॅटरल सायनस व मेनिन्जायटिससारखा गुंतागुंतीचा आजार होऊ शकतो. फेशियल नसांवर परिणाम झाल्यास चक्कर येते. सिक्रेटरी अवस्थेत कान वाहत नाही. कमी ऐकू येते. त्याचबरोबर कान बंद होतो.

उपचार : अॅक्यूट अवस्थेत औषधाने दुरुस्त करता येते. नेहमी अशी अवस्था होण्यामागे टॉन्सिल्स, अॅडनॉयड्स व सायनसची समस्या असते. त्यांच्यावरही उपचार केला जातो. सिक्रेटरी अवस्थेत काही वेळा मायरिंगोटॉमी केली जाते. यात पडद्यातून द्रव बाहेर काढला जातो. तसेच व्हेंटिलेशन ट्यूब टाकण्यात येते. सर्जरीची गरज : क्रॉनिक अवस्थेत सर्जरीची गरज असते. औषधाने संसर्ग नियंत्रणात आणता येतो. पडद्याचे छिद्र दुरुस्त करण्यासाठी प्रत्यारोपण सर्जरीची गरज भासते. याला टिम्पॅनोप्लास्टी असे म्हणतात. याला अंडरले किंव इंटरले तंत्राने केले जाते. मॅस्टॉइड हाड सडल्यास ते दुरुस्त करणे आवश्यक असते. त्यामुळे पुढील धोका टाळता येतो. याला मेस्टॉयडॅक्टमी असे म्हणतात. ही दोन प्रकारे होऊ शकते. कॅनॉल वॉल डाऊन - यात रोग नाहीसा करण्यासाठी कानाच्या आत कॅव्हिटी होते. तसेच कॅनॉल रुंद होतो. दुसरा इंटॅक्ट कॅनॉल वॉल- यात कानाचा आकार व रचना कायम ठेवली जाते.


Dr Vilas W Rathod

Blogger