राज्यात 12 हजार 528 पोलिसांची पदे भरण्याचा मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

 


पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या १६ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात जवळपास साडे बारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार असून सदरील पोलीस भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येऊन डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीनंतर दिली आहे.

पोलीस शिपाई संवर्गातील २०१९ वर्षात रिक्त झालेले ५२९७ पदे तसेच २०२० वर्षात रिक्त झालेले ६७२६ पदे आणि मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या एकूण ९७५ पदांपैकी पहिल्या टप्प्यातील पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२ हजार ५२८ पदे भरण्यात येणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला आदेश दिले आहेत.

दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे संभाजी राजे भोसले यांनी भरतीला तीव्र आक्षेप घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत  असून राज्यात पोलीस विभागातील भरती करताना मराठा समाजासाठी १३% जागा बाजूला काढून ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला न्याय देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

Read  राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती, करोना संकटात ठाकरे सरकाराचा मोठा निर्णय