पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी ,राठोडांची विकेट पडणार?



पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारवर दबाव वाढताना दिसतो आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री संजय राठोड हेच पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आतापर्यंत दबक्या आवाजात संजय राठोड यांचं घेतलं जाणारं नाव आता उघडपणे घेतलं जात आहे. त्यामुळेच संजय राठोड प्रकरणी ठाकरे सरकारवर दबाव वाढतो आहे. (Pooja Chavan Suicide case Pressure on Thackeray government)

भाजपनं थेट मंत्री संजय राठोडांचं नाव घेतलं पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पुण्यात जी पहिली तक्रार दाखल केली तिच मुळात भाजपच्या शहराध्यक्षा अर्चना पाटील यांनी केली. त्यानंतर काल भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मंत्री संजय राठोड यांचं थेट नाव न घेता ठाकरे सरकार राठोडगिरी कुठपर्यंत सहन करणार असा सवाल केला. त्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकारांसमोर येऊन प्रकरणाची पूर्ण चौकशीची मागणी केली. पण यात मंत्री संजय राठोडच असल्याचं नाव घेणं त्यांनी टाळलं. आज सायंकाळी त्यांनी पोलीस महासंचालकांना चौकशीचं मागणी करणारं पत्र लिहिलं पण त्यातही त्यांनी संजय राठोड यांचं नाव घेतलं नाही. मात्र रात्री भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री राठोड यांचं नाव घेऊन आरोप केला. वाट कसली बघताय, मुसक्या आवळा असं वाघ म्हणाल्या.


काँग्रेस-राष्ट्रवादीचाही दबाव वाढणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात प्रश्न विचारले, पण त्यावरही त्यांनी सामान्य आत्महत्या असतात त्यावर जसे उत्तर द्यायचे तसे दिले. म्हणजे पोलीस चौकशी वगैरे करतील असं सांगितलं. पण मंत्री संजय राठोड यांचं तोपर्यंत नाव कुणीही घेतलं नसल्यामुळे कदाचित अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं असावं. पण संजय राठोड यांचं थेट नाव आल्यामुळे कदाचित काँग्रेस राष्ट्रवादी दबाव निर्माण करु शकते. ती राजकीय संधीही मंत्री संजय राठोड यांच्यामुळे आल्याचं दिसतं आहे.


कोण आहेत मंत्री संजय राठोड?

संजय राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील बडे नेते आहेत. ते बंजारा समाजातून येतात. शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पहिल्यांदा 2004 साली यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले. त्यानंतर 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळा पुन्हा संजय राठोड आमदार म्हणून विधानसभेत गेले. फडणवीसांच्या 2014 साली राठोड यांच्याकडे यवतमाळच्या सहपालकमंत्रिपदासह महसूल राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली. 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा, त्यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला. (Pooja Chavan Suicide case Thackeray government Pressure)