🛕 पुण्यातील मंदिरे ३० जूनपर्यंत बंदच राहणार


पुण्यात आज ( सोमवारी) पासून सर्व व्यवहार सुरळीत करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र पुण्यातील महत्वाची असणारी मंदिरे मात्र ३० जूनपर्यंत बंदच राहणार आहेत. असे मंदिरांच्या विश्वस्थांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबत  सारसबाग सिद्धिविनायक मंदिर, कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणपती आणि मृत्युंजयेश्वर ही मंदिरे ३० जूनपर्यंत बंदच राहणार असल्याचे श्री देवदेवेश्वर संस्थानाचे प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांनी रविवारी (ता.७) स्पष्ट केले.

सोमवारी (दि.८) रोजी संकष्टी चतुर्थी आहे. या पार्श्वभूमीवर पंडित म्हणाले, "लॉकडाऊनच्या नव्या टप्प्यात केंद्र सरकारने ८ जून पासून मंदिरे खुली होत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र राज्य सरकारने मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असल्याने  देवदेवेश्वर संस्थानची सारसबाग सिद्धिविनायक मंदिर, कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणपती आणि मृत्युंजयेश्वर ही मंदिरे ३० जूनपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी मंदिर परिसरात उगीच गर्दी करू नये, असे आवाहन मंदिर संस्थांकडून करण्यात आले आहे. शासनाचा पुढील आदेश येइपर्यंत मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. असेही मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यातच, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे मंदिरही ३० जूनपर्यंत बंदच राहणार असल्याचे ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी स्पष्ट केले आहे.