💥 आता लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णावर घरातच उपचार [ बीड बातम्या ]


 कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी आता याबाबतची भीती कमी करण्याचा प्रयत्न सरकारीपातळीवर देखील सुरु आहे. कोरोनाचा राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण पाहता यापुढे सौम्य लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना घरातच अलगीकरण करून उपचार करता येणार आहेत.

ज्यांच्या घरातही व्यवस्था असेल अशांना घरातच अलगीकरणात ठेवावे असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी कोरोनाचा मृत्युदर कमी असून लक्षणे नसलेल्या किंवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. समांतर सध्या पॉझिटिव्ह असलेल्या किंवा अहवालांची प्रतीक्षा असलेल्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये अलगीकरणात ठेवले जाते.

यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढत आहे. तो कमी करावा आणि कोरोनाबाबतची भीती देखील कमी व्हावी यासाठी आता सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणेच नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना त्यांच्या घरात पुरेशी सोय (म्हणजे रुग्णांसाठी स्वतंत्र खोली, २४ तास काळजी घेणारी व्यक्ती आणि कुटुंबाची होम क्वारंटाईन होण्याची व्यवस्था) असेल तर अशा रुग्णांना घरातच अलगीकरणात ठेवावे असे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाने जारी  केले आहेत.

 त्यासोबतच अशा रुग्णांना पुन्हा त्रास झाला नाही, किंवा लक्षणे संपली तर १७ दिवसानंतर यांनी आपोआप अलगीकरण संपवावे आणि त्यासाठी कोणत्याही तपासणीची देखील गरज नाही असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.