✍️ Breaking News पाकिस्तानच्या नापाक कारवाया


चीन आणि भारतात 15 तारखेला झालेल्या हिंसाचाराची पाकिस्तानला पूर्वकल्पना होती, यावर सर्व माजी लष्करी अधिका-यांचे एकमत आहे. एरव्ही प्रत्येक घटनेबाबत ओरड करणारा पाकिस्तान चीनच्या हल्ल्याबाबत अवाक्षरही काढायला तयार नाही. उलट, हल्ला झाल्यानंतर लगेचच पाकिस्तानच्या तीनही लष्करी प्रमुखांची तातडीने बैठक झाली. त्यात आढावा घेण्यात आला. गेल्या पाच आॅगस्टला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यापासूनच चीन आणि पाकिस्तान भारतावर नाराज आहेत. चीनने त्याबाबत माैन बाळगले होते, तरीही पाकिस्तान मात्र जगभरातून या निर्णयाच्या विरोधात आपल्याला पाठिंबा मिळवण्यासाठी धडपडत होता; परंतु मलेशिया आणि तुर्कस्थान वगळता कोणत्याही देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही.

काश्मीर खो-यांत तेव्हापासून लष्कर मोठ्या प्रमाणात असून पाकिस्तानचे नापाक इरादे यशस्वी होऊ दिलेले नाहीत. अनेक दहशतवाद्यांना मूठमाती देण्याचे काम लष्कराने केले. त्यात पाकिस्तानातील अतिरेकी संघटनेच्या अनेक सदस्यांचाही समावेश आहे. चीनने लडाखमधील केलेल्या कारवाईची माहिती पाकिस्तानला अगोदरच देण्यात आली, शिवाय चीनच्या सीमेवर भारताच्या सैन्याला जमायला लावून पाकिस्तानला काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसायला लावायचे, प्रसंगी काश्मीरवर हल्ला करायचा, हा या दोन्ही देशांचा अंतस्थ हेतू होता, हे लपून राहिलेले नाही. पाकिस्तानही चीनप्रमाणेच अंतर्गत प्रश्नांनी त्रस्त आहे. तेथील अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय वाईट आहे. महागाई वाढली आहे.

कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत लोकांची नाराजी वाढली आहे. त्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी भारताचा बागुलबुवा दाखवून कारवाया करायच्या, असे तेथील लष्कराचे धोरण आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे काहीच चालत नाही. लष्कराने त्यांची अकार्यक्षमता हेरून त्यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले आहे. भारताचे सैन्य चीनच्या सीमेवर गुंतल्याचे एकदा का स्पष्ट झाले, तर लगेच पाकच्या नापाक कारवाया सुरू होतील, असे सैन्यदलाला वाटते. भारत-चीनमधील तणावाच्या स्थितीचा पाकिस्तानकडून फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे, अशी शक्यता जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी व्यक्त केली.

काश्मीर खोऱ्यात मोठ्या संख्येत दहशवाद्यांची घुसखोरी करण्याचा आणि हिंसाचार घडवण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. कोरोनाच्या संकटातही पाकिस्तानकडून सीमेवर घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानचे  हे प्रयत्न उधळून लावण्यासाठी सीमेवर अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असून लष्करी अधिकारी आणि पोलिस महासंचालकांना याची जाणीव आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेला लागून असलेल्या दहशतवादी तळांवर तीनशे दहशतवादी दबा धरून आहेत. हे दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. काश्मीर खोऱ्यात हिंसाचार घडवण्याचा त्यांचा डाव आहे.  जैश- ए- मोहमद, हिज्बुल मुजाहिदीन , लश्कर- ए- तोयबा आणि इतर संघटना काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्यासाठी एकत्र आल्या आहेत. त्यामुळे महामार्गांवरील सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. गस्त वाढवण्यात आली आहे.

भारताच्या दृष्टीनं दोन सीमांवर एकाच वेळी लढणं कठीण आहे. नेमक्या याच परिस्थितीचा चीन आणि पाकिस्तान फायदा घेत आहे. सध्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अशांतता आहे. अंतर्गत प्रश्नांत गुंतल्यामुळं अमेरिका भारताच्या मदतीला येऊ शकत नाही, याची माहिती असल्यानंच चीन आणि पाकिस्ताननं संगनमतानं ही कृती केली असं मानायला जागा आहे. थोडक्यात लडाखचा पेचप्रसंग हे निमित्त आहे. खरं उद्दिष्ट भारतीय सैन्याला गुंतवून ठेवणं हेच असावं...