🗣️ बावरी प्रीत Bawri Preet


वाट पाहता तुझी संध्याकाळ ही टळून गेली,
तोपर्यंत सोबत होती सावली माझ्या, 
पण ती ही मला एकटे सोडून गेली.

जाता जाता धीर देऊन गेली की,
वेड्या थांब, नको धीर सोडू.....ती येईल....
भेटेल तुला तुझी सखी.

समुद्राकाठच्या शंख-शिंपल्यासारखीच,
मला ही आतुरता होती तुझ्या भेटीची,
त्यांची भेट झाली त्या लाटेशी,
पण माझी मात्र अजून अधुरीच होती कहाणी त्या अनामिक ओढीची.

खूप वाट पाहिली एकाकी तुझी, 
अगं पण तू का नाही आली ?
स्वतःच स्वतःची समजूत काढता काढता खूपच दमछाक झाली.

बुद्धी सतत सांगत होती वेडा आहेस तू, नाही येणार ती
मन मात्र सांगत होतं नक्की येईल ती,
तुझाच भाग आहे, तुझ्यापासून विलग नाही व्हायची ती.

पार हरवून जायचं होतं अगं स्वतःचं अस्तित्व तुझ्या सहवासात,
अन तुला पाहता पाहता शोधायचं होतं पुन्हा स्वतःला तुझ्यात.
पण सारंच राहून गेलं, तुझ्या न येण्यानं.

नको न असं वागू, तू नसलीस ना जवळ की सतत काही हरवल्याचा भास होतो
मग शोध सुरु होतो आणि शेवट तुझ्याच पाशी होतो... तुझ्याच पाशी होतो...