पत्नी, मुलाचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

 



माजलगाव : स्वतःच्या पत्नीचा आणि मुलाचा ओढणीने गळा आवळून खून करत पतीने स्वतःला चाकूने भोसकून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना माजलगाव तालुक्यातील रामनगर तांड्यावर बुधवारी दुपारी घडली. स्वतःचा जीव जात नसल्याने पतीने विद्युत रोहीत्रालाही पकडण्याचा प्रयत्न केला होता.


बंडू उत्तम जाधव (वय ३२, रा. रामनगर तांडा) असे त्या पतीचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील मोगरा जवळील रामनगर तांडा येथील बंडू बुधवारी दुपारी कुटूंबासह शेतात कापुस वेचणीसाठी गेला होता. दुपारी ४ वाजताच्या सुमारास बंडूने कापुस वेचत असलेली त्याची पत्नी गंगा उत्तम जाधव (वय २८) हिला अचानक ओढणीने गळा दाबुन मारहाण केली. जवळच काही अंतरावर त्याचा मुलगा करण (वय ८) व मुलगी पुजा (वय १२) हे झाडाखाली बसलेले होते. त्यांच्याजवळ जाऊन बंडूने करणला सोबत घेतले आणि मुलगी पुजाला शंभर रुपये देवून गावी पाठवले. करणला घेऊन बंडू पत्नी गंगा पडलेल्या ठिकाणी गेला. तिथे बंडूने ओढणीने गळा दाबून करणचा खून केला. दोघाही माय-लेकराच्या जिवंत राहण्याची शक्यात नको म्हणून त्याने दोघांच्याही पोटात चाकुने वार केले. त्यानंतर स्वतःच्या पोटातही चाकु खुपसून घेतला. यावेळी रक्तबंबाळ झाल्याने तो तडफडू लागला. त्यानंतरही स्वतःचा जीव जात नसल्याने त्याने जवळच असलेल्या विद्युत रोहीत्राला पकडून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, विजेच्या धक्क्याने तो दूर फेकल्या गेला. दरम्यान, ही घटना माहित झाल्यानंतर परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी बंडूला माजलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार करून त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान, या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बंडूने हे कृत्य का केले हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दिंद्रुड पोलीस पुढील तपास करत आहेत.